मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिंदे भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चाललेली आहे. अवघ्या अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत.
सरकार बरखास्त होणार; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत
सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.