Sunday , July 13 2025
Breaking News

मुख्यमंत्र्यांचा एक्झिट प्लॅन ठरला? पुन्हा शिवसेना-भाजप युती सरकारची नांदी

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणीत पराभवाला सामोरं जाऊन नाचक्की करुन घेण्याऐवजी उद्धव ठाकरे आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत मतभेद झाल्याच्या कारणावरुन ठाकरे पद सोडणार असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतरही एकजूट राखत महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा सत्ताधारी पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, असा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणार आहे. त्याला काँग्रेस विरोध करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारीच या मुद्द्यावरून राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा महाविकास आघाडीतील वरिष्ठ वर्तुळात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला असता बुधवारी यासाठी पुन्हा मंत्रिमंडळ बैठक बोलावण्याचे निर्देश देण्यात आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन यासंदर्भात बातचित केली. यानंतर या मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली. यात या नामांतराला पक्षाने विरोध करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे समजते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यामागे मोठी राजकीय रणनीती असून काँग्रेस पक्षाशी मतभेद झाल्याचे दाखवत ठाकरे आपल्या पक्षातील आमदारांसोबत एकत्र येण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येईल व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखाच्या भूमिकेत दिसतील, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये काल रात्रीपासून सुरू झाली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन वादविवाद सुरु आहेत. विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेनेच्या सभेतही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही अचूक वेळ साधली.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित!

Spread the love  मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *