मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावार काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्वीटबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली, तेव्हा ते ट्वीटर अकाऊंट आपलं नसून फेक असल्याचं बोम्मई बैठकीत म्हणाले.
बोम्मई यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे, तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ’15-20 दिवस हा प्रश्न चिघळला, मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झालं, खुलासा करायला इतके दिवस का लागले. अटका प्रत्यक्ष झाल्या, महाराष्ट्रातल्या वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली. हे ट्वीटरवर झालं नव्हतं. मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे. हा खुलासा दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता?’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
‘सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित असताना दोन्ही राज्यांनी काही करू नये, हा काही नवीन सल्ला नाही. सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायचं का? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. कालच्या बैठकीत नवीन काय झालं?,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.