Monday , September 21 2026
Breaking News

महाविकास आघाडीचा दिल्लीत फॉर्म्युला ठरला?

Spread the love

 

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार आहेत. या निकालावर आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून येणार आहे. तसं घडलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळू शकतं. हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला मोठा झटका बसणार आहे. या प्रकरणाच्या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना विरोधी पक्षांच्या गोटात दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीआधी काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा झाली.

बैठकीत नेमकं काय ठरलं?
यावेळी दोन-तीन जागा वगळता सर्व जागांवर तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समसमाना जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर आता तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे. आता फक्त दोन-तीन जागांबाबत अजून एकमत झालेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा
दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेच्या 23 जागांवर याआधीच दावा केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून याबाबत वारंवार भूमिका मांडण्यात आली आहे. तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर टीका केली. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक संघर्ष बघायला मिळाला. तसेच जागावाटपाबाबत दिल्लीत निर्णय होतील, याबाबत दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे कुणी नेते त्यावर भूमिका मांडत असतील तर त्याकडे आपण लक्ष देणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली होती. त्यावर नार्वेकरांनी टीका केली होती. जागावाटपावरुन सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *