मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी (मंगळावारी) जाहीर केली. लोकसभेच्या 5 उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीतून करण्यात आली. आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीतून 5 लोकसभा जागांवरील उमेदवारींची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांनीच लढावं, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढणार आहे. इथून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. मात्र, आता त्यांनीच इथून लढावं, असा आग्रह केला जात आहे. महायुतीविरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे.