Sunday , June 28 2026
Breaking News

निवृत्त शासकीय सहसचिव दादासाहेब उर्फ गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे निधन

Spread the love

ठाण्यात निधन झाल्याने निपाणी परिसरात हळहळ

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी दादासाहेब उर्फ गो. श्री.पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (ता.१६ ) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत आणि विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर मंगळवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्या येणार आहेत. काही वर्षांपूर्वी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री होते. मंत्रालयात नगर विकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा उस्फूर्त प्रतिसाद होता. पंत म्हणजे कायदा पूर्ण कोळून प्यायलेले गृहस्थ होते. त्यांची निरीच्छ वृत्ती होती. वास्तविक ते अशा पदावर होते की सहज अफाट संपत्ती ते कमवू शकले असते. आजचे अनेक अधिकारी पाहिल्यावर सहजच वाटून जाते. पण सुपारीप्रेमी पंत यांनी कधीही कोणाच्याही सुपारीच्या खांडाचेही मिंधेपण स्वीकारले नाही. म्हणूनच त्यांचे म्हणणे कोणीही अमान्य करत नव्हते. अनेक मुख्यमंत्री, कायदे तज्ञ रामराव आदिक, शीघ्रकोपी पतंगराव कदम किंवा कठोर शिस्तीचे द.म.सुखटणकर हे सुद्धा यास अपवाद नव्हते. पंतांचे ‘आत्मभान’ हे छोटेखानी आत्मकथन वाचले की त्याचा सहज प्रत्यय येतो. मुंबई उच्च न्यायालयातही विविध प्रकरणांच्या संदर्भात पंतांचा नियमित वावर होता. त्यांनी एखादा मुद्दा शासनाच्या वतीने मांडला की न्यायालय तो सामान्यपणे उचलून धरला जात होता. पंतबाळेकुंद्री आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ नगर विकास सचिव डी. टी. जोसेफ यांनी अथक परिश्रम करुन मुंबई नागरी वारसा नियमावली सिद्ध केली. तिला अपेक्षेनुसार आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्यासमोर ही सविस्तर सुनावणी झाली. प्रतिवादी होते गलेलठ्ठ विकासक आणि त्यांचे खंदे वकील असताना पण पंत सर्वांना सोबत घेऊन गेले. परिणामी मुंबईचा बराच नागरी इतिहास बचावला. अन्यथा कुलाब्यापासून थेट माहीम-वाशीम या पट्ट्यात एकही ऐतिहासिक वास्तू वाचू शकली नसती. चहूकडे सीमेंटचे जंगल उभे झाले असते. पंतबाळेकुंद्री आणि जोसेफ ही लढाई एकहाती लढली. या दोघांचे ऋण मुंबई कधीच विसरू शकणार नाही. ही नियमावली आज देशभरातील राज्यांनी जवळपास तशीच स्वीकारली आहे. पंत यांच्या निधनाने एक आदर्श लोक सेवक गमावल्याची प्रतिक्रिया अक्कोळ येथील डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Spread the love  पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *