
रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी ठोस भूमिका मांडत हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केले. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायलायामध्ये प्रलंबित असल्याने त्याच्या लवकर सुनावणीसाठी आणि निकालासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले की, हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असला तरी राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सक्षम व सर्वोत्तम वकील नियुक्त करणे गरजेचे आहे. प्रकरणाची प्रभावी मांडणी होऊन लवकर सुनावणीसाठी ते पुढाकार घेतील. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्यायालयातील सुनावणीच्या तारखा मिळवणे आणि प्रकरणाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हा वाद महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांशी संबंधित असल्याने केंद्र सरकारची भूमिकाही महत्त्वाची ठरते, असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात केंद्राचे लक्ष वेधून त्यांची हस्तक्षेपाची गरज अधोरेखित करणार असल्याचे सांगत, “राज्य व केंद्र या दोन्ही स्तरांवर समन्वय साधून या प्रश्नाला गती देण्यासाठी मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेन,” असे त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान, सीमाभागातील नागरिकांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, प्रेस रिपोर्टर्स तसेच सोशल मीडिया क्षेत्रातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होत स्वाक्षऱ्या करून आपला ठाम पाठिंबा दर्शवत आहेत.
यावेळी सचिन कदम (साम टीव्ही रायगड प्रतिनिधी), गणेश माप्रालकर (एबीपी माझा रायगड प्रतिनिधी), आजेश नाडकर (जय महाराष्ट्र रायगड प्रतिनिधी) यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख, अरुण पोवार, रवींद्र कु्वेस्कर, प्रतीक मोरे व कू. दाखनिकर
या सर्वांनी स्वाक्षरी करून मोहिमेला भक्कम पाठिंबा दिला. यावेळी दै. पुढारी चे माणगाव विभागीय उपसंपादक होवाळ हेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta