नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत अधिक माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, आज दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. यावेळी झालेल्या चर्चेत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देश जमीन आकाश आणि पाण्यामधून होत असलेले हल्ले तत्काळ प्रभावाने थांबवण्यावर सहमत झाले आहेत. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. आता दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी पुढील चर्चा करतील, असेही विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.