नवी दिल्ली : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ‘आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही’ अशी मोठी घोषणा बलुच नेत्यांनी केली आहे. १४ मे २०२५ रोजी बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही आणि हा निर्णय दशकांपासून चालणाऱ्या लष्करी अत्याचार, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध बलुच जनतेचा राष्ट्रीय आदेश आहे.’
मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘तुम्ही मराल, आम्ही बाहेर जाऊ. आम्ही आमची जात वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहोत. या आणि आमच्यात सामील व्हा. बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही आणि जग आता मूकप्रेक्षक राहू शकत नाही.’ त्यांनी विशेषतः भारतातील नागरिकांना, माध्यमांना, युट्यूबर्सना बलुचांना पाकिस्तानचे लोकं असल्याचे म्हणणे थांबवण्याचे आवाहन केले.