हैदराबाद : हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील गुलझार हाऊसजवळील एका इमारतीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चारमिनार जवळच्या या इमारतीमध्ये भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या प्रमाणात राहणाऱ्यांची संख्या असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच पहाटे अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. पण आगीच्या तीव्रतेमुळे आणि धुरामुळे बचावकार्यात अडथळे आले. पण चार ते पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमध्ये गंभीर भाजलेले आणि दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री आणि राज्य भाजपा प्रमुख जी किशन रेड्डी आणि तेलंगानाचे मंत्री पोन्नम प्रभाकर चारमिनार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांना धीर दिला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथील गर्दीवर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. ही घटना हैदराबादमधील गेल्या काही दिवसांतील दुसरी मोठी आगीची घटना आहे. याआधी १४ मे रोजी बेगम बाजारातही अशीच आगीची घटना घडली होती.