अहमदाबाद : अहमदाबादच्या मेघानीनगर या ठिकाणी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते कोसळलं आणि त्याला आग लागली. यानंतर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पाहायला मिळाले. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच अहमदाबाद आणि आसपासच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 5 मोठ्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र विजय रूपाणी हे विमानात होते की नाही, याबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.