Sunday , September 20 2026
Breaking News

खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आसाममध्ये तक्रार; अटकेची मागणी

Spread the love

 

बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्याविरोधात कथित वादग्रस्त व भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आसाममधील गुवाहाटी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर आसाम प्रांताचे प्रांत कार्यवाह खगन सैकिया यांनी कामरूप पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. नीलांबाजार येथे झालेल्या निवडणूक सभेत खर्गे यांनी कथितरित्या सामुदायिक व द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ७ एप्रिल रोजी झालेल्या सभेत खर्गे यांनी एका विशिष्ट समुदायासमोर आरएसएस व भाजप कार्यकर्त्यांविरोधात भडकाऊ विधान केले. “तुम्ही नमाज अदा करत असताना तुमच्या समोर विषारी साप फिरत असेल, तर प्रार्थना थांबवून आधी त्या सापाला ठार मारावे,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचा आरोप आहे. या उदाहरणाद्वारे आरएसएस आणि भाजप यांची तुलना “विषारी सापाशी” करून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, काही वृत्तवाहिन्यांनीही तो प्रसारित केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

तसेच, जनप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम ८३ अंतर्गत हे विधान द्वेष पसरविणारे व हिंसाचाराला उत्तेजन देणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस समर्थकांसमोर केलेल्या या वक्तव्यामुळे आरएसएस व भाजप कार्यकर्त्यांविरोधात शारीरिक हानीची शक्यता निर्माण होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे समाजातील हिंदू-मुस्लिम ऐक्य धोक्यात येऊ शकते व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित वक्तव्यावरून योग्य ती कायदेशीर कारवाई करून खर्गे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी तक्रारदाराने पोलिसांकडे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *