मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मृत विद्यार्थ्यांच्या परिवाराला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पलटली. या घटनेतील जखमी विद्यार्थिनींवर इंफाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल माध्यमातून लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, “आज ओल्ड कछार रोडवर शाळेची बस पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे मोठं दु:ख झालं. बचाव अभियानासाठी एसडीआरएफ, वैद्यकीय टीम आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळावर पोहोचले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करतो.”
या अपघातामध्ये ज्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घेतला आहे.