केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी : विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर निपाणीत मेळावा
निपाणी : केंद्रातील भाजपा सरकार सहा वर्षे तर राज्यातील भाजप सरकार अडीच वर्षे काम करूनही शेतकर्यांच्या विरोधात कायदे करून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये तब्बल सातशे शेतकर्यांचा बळी गेला आहे.
तरीही या सरकारला सर्वसामान्यांची कीव आली नाही अखेर नमते घेऊन सरकारने हे कायदे मागे घेतले. तसेच स्वयंपाक गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे केले त्यामुळे अशा सरकारला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.
विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारार्थ येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनामध्ये बुधवारी सायंकाळी मेळावा पार पडला. त्यावेळी जारकीहोळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जारकीहोळी म्हणाले, काँग्रेस पक्षाला शंभर वर्षाचा इतिहास असून या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे. सन 2023 साली राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणार आहे त्याची आतापासूनच कार्यकर्त्यांनी तयारी केली पाहिजे.
भाजपचे विधान परिषदेचे सदस्य कवटगीमठ गेल्या पाच वर्षात मतदारसंघात फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून काम करणे आवश्यक आहे काँग्रेसमध्ये गोंधळ घालणारे नसून भाजपमध्येच गोंधळ घालणारे अनेक नेते आहेत त्यांचा बंदोबस्त या निवडणुकीत केला पाहिजे.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, देशात आणि राज्यात भाजपा सरकार असून अनेक मोठमोठी स्वप्ने दाखवली. त्याशिवाय अक्षय दिनाचे गाजर दाखवतच आपला कार्यकाळ पूर्ण केला. बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक आपत्ती येऊनही पंतप्रधान मोदी यांनी एकदाही दौरा केला नाही यावरूनच त्यांचे जनतेचे प्रेम दिसून येते. या निवडणुकीत चार हजार मतदारांचा पाठिंबा असून येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन झाले. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी स्वागत केले. मेळाव्यास माजी मंत्री ए. बी. पाटील, बसवराज पाटील, राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, रोहन साळवे, नगरसेवक संजय सांगावकर, शेरु बडेघर, शौकत मनेर, दीपक सावंत, संजय पावले, अण्णासाहेब हावले, दिलीप पठाडे, शाहिदा मुजावर, दीपक ढनाल, अमोल बन्ने, युवराज कोळी, अमृत ढोले, कासीमखान पठाण, विष्णू कडाकणे, अरुण निकाडे, अनिता पठाडे यांच्यासह ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतीचे सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले. बसवराज पाटील यांनी आभार मानले.