माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद ; माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : स्थानिक आमदार खासदारांची निपाणी नगरपालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता होती. या काळात जवाहर तलावातील गाळ काढता आला नाही. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गाळ काढण्याचा केवळ फोर्स केला. त्यांच्या नियोजन अभावी आता शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी केला. माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सभापती व नगरसेवक संघटनेच्या सोमवारी (ता.२०) झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जासुद म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पाणी योजना पूर्ण करून तलावही भरला. आपण नगराध्यक्ष असताना २००४ साली दोन वेळा तलावाचा दरवाजा उघडून गाळ बाहेर सोडला होता. पण सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे शहरात दहा दिवसातून एकदा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अजूनही वेळ गेलेली नसून नागरिकांना मोफत मध्ये गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ यांनी, गाळ काढण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणे म्हणजे उशिरा असलेले शहाणपण आहे. शहराचा पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा बनला असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जोल्ले दाम्पत्य राजकारणाचा स्वतःचे हित आणि आर्थिक बाजू भक्काम करण्यासाठी वापर करत आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम अवताडे कंत्राटदारांना दिल्याचे खोटे असून नागरिकांची दिशाभूल केली आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी आपल्या काळात तलावातील मुरूम पुंजी लॉर्ड कंपनीला देऊन तलावाची खोली वाढवली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. असे असताना गाळ काढण्याबाबतचे निवेदन म्हणजे स्वतःच्या अकार्यक्षमतेचा पुरावा असल्याचे पोळ यांनी सांगितले. माजी सभापती किरण कोकरे, माजी नगरसेवक धनाजी निर्मळे, रियाज बागवान यांनीही आपली मते मांडली.
बैठकीस माजी नगराध्यक्ष विजय शेटके, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, बबन घाटगे, झाकीर कादरी, माजी नगरसेवक मुकुंद रावण, युवराज पोळ, अशोक लाखे, शशिकांत चडचाळे, जीवन घस्ते, सुरेश गाडीवड्डर, शरीफ बेपारी, दीपक ढणाल, बबन चौगुले, प्रथमेश जासूद, किसन दावणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.