
सहकारत्न उत्तम पाटील ; निपाणीत अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

निपाणी वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत समूहातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचा सर्वांना लाभ होत आहे. केवळ सहकारापुरतेच अरिहंत संस्था मर्यादित नसून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही संस्थेचे कार्य सुरू आहे. त्याचा मतदारसंघातील नागरिकांना चांगला उपयोग होत आहे. यापुढील काळातही अरिहंत उद्योग समूहातर्फे नागरिकांचे हितासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मतदारसंघातील नवोदित खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
शहर आणि ग्रामीण भागातील नवोदित क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अरिहंत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित ‘अरिहंत चषक पर्व-३’ आंतरराज्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेला शनिवारी (ता.११) प्रारंभ झाला झाली. म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहकार महर्षी दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त अरिहंत उद्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर येथील फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. अरिहंत उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही अशा स्पर्धांद्वारे खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत राहील.अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. उत्तम पाटील यांनी फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. नाणेफेक उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. वाठार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उद्घाटनाचा पहिला सामना संकेश्वर व वाठार संघांमध्ये रंगला. यावेळी उत्तम पाटील यांनी संयोजकांच्या नियोजनाचे कौतुक करत खेळाडूंनी पराभवातूनही शिकून पुढे जाण्याचा सल्ला दिला. खेळात हार-जीत असतेच; मात्र चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास डॉ. सी. बी. कुरबेट्टी, माजी नगरसेवक रवी शिंदे, शेरू बडेघर, दत्ता नाईक, दिलीप पठाडे, विजय मांजरेकर, वर्धमान पाटील, राजू पाटील, विष्णू कडाकणे, बाबासाहेब खोत, प्रा.सचिन खोत, सचिन पवार, निरंजन पाटील, सुंदर पाटील, महेश पाटील, संतोष माने, संदीप संकपाळ, इरफान महान, इम्रान मकानदार, शिरीष कमते यांच्यासह मान्यवर व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. माजी नगरसेवक विनायक वडे यांनी स्वागत केले. चंद्रकांत मोरे यांनी आभार मानले.
——————————————————————-
५ लाखांच्या बक्षिसांची आकर्षक स्पर्धा…..
या स्पर्धेसाठी एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्या संघास २ लाख, उपविजेत्यास १ लाख, तर तृतीय क्रमांकासाठी ५० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक मॅचला मॅन ऑफ दि अवार्ड याशिवाय बेस्ट बॅट्समनला स्मार्टफोन बेस्ट बाॅलरला सायकल यांसारखी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta