हुक्केरी (प्रतिनिधी) : मणगुत्ती (तालुका हुक्केरी) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी हे होते.
प्रारंभी मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी स्वामी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे मार्गदर्शनपर भाषण झाले. एम. के. राऊत, आर. बी. शामणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचीही समयोचित भाषणे झाली.
आर. ए. कामनगोळ, एस. एम. कोतेकर, ए. के. पाटील व बाळू कदम आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सौ. सई पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर क्रीडाशिक्षक एस. के. मेंडूळे यांनी आभार मानले.