एकाच दिवसात ८४८ भूखंड नोंद केल्याचा आरोप
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून, मुडाचे माजी अध्यक्ष एच. व्ही. राजीव यांनी आयुक्तांची परवानगी न घेता एकाच दिवसात शेकडो भूखंडांची खाते नोंदणी केल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे.
मुडा मधील पर्यायी जमीन वाटपाच्या कथित घोटाळ्याने राज्यात मोठा गाजावाजा केला आहे आणि या घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांनी बंगळुर ते म्हैसूर अशी पदयात्रा काढली.
या घोटाळ्यात आता आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. यापूर्वी मुडाचे अध्यक्ष असलेले एच. व्ही. राजीव यांनी म्हैसूरच्या ज्ञानगंगा होम कन्स्ट्रक्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ८४८ भूखंडांचे खाते काढल्याचे उघड झाले आहे.
ज्ञानगंगा गृहनिर्माण सहकारी संस्थेने म्हैसूरमधील कुरगल्ली, नगरताहळ्ळी आणि बल्लाहळ्ळी या गावांमध्ये एकूण २५२ एकर जागेत वसाहत निर्माण केली होती. या वसाहतीची निर्मिती मुडाच्या २०१८ च्या आदेशाच्या विरोधात असल्याने काही जमिनींच्या सर्व्हे क्रमांकाचाही वाद न्यायालयात आहे.
त्यामुळे मुडाने या वसाहतीच्या जमिनीचे हक्क हस्तांतरित करू नयेत, असा आदेश आहे. असे असतानाही एच. व्ही. राजीव यांनी मुडामधून एकाच दिवसात ८४८ प्लॉट बुक केल्याचा आरोप ऐकायला मिळत आहे.
मुडा आयुक्तांच्या मान्यतेशिवाय खाते उघडण्यात आल्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. आयुक्तांची मान्यता नसतानाही तांत्रिक शाखेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जागा सोडण्यात आली. याबाबत माजी मुडा आयुक्त नतेश यांनी शासनाच्या नगरविकास प्राधिकरणाच्या सचिवांना पत्र लिहून खुलासा केल्याचे उघड झाले आहे.
राजीव हे स्वत: ज्ञानगंगा होम कन्स्ट्रक्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे आरोप झाले आहेत.