Sunday , June 14 2026
Breaking News

राजकीय गोंधळ थांबवण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलवा; सतीश जारकीहोळींची मागणी

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटकातील राजकीय गोंधळावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तातडीने दिल्लीला बोलवून चर्चा करावी, अशी मागणी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.

मंगळवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनीही याच मुद्द्यावर अलीकडे भाष्य केले होते. “हा गोंधळ किती दिवस चालणार? लवकर निर्णय घेतला पाहिजे. हायकमांडने सर्वांना बोलावून ठोस निर्णय घ्यावा,” असे ते म्हणाले.

‘अहिंद’ मतदार पुन्हा एकत्र आणले

जारकिहोळी यांनी सांगितले की, “आम्ही ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) मतदार पुन्हा एकत्र आणण्यात यशस्वी झालो आहोत. आमच्या टीमने त्यासाठी मोठे काम केले. शिग्गावमध्येही हीच रणनीती वापरली होती आणि त्याचा फायदा झाला. काँग्रेसच्या विजयासाठी हे मतदार महत्त्वाचे आहेत.”

ते पुढे म्हणाले की, २०२८ पर्यंत ‘अहिंद’ मतदारांना एकत्र ठेवणे हे मोठे आव्हान आहे. “आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये वेगळी रणनीती राबवावी लागेल,” असे त्यांनी नमूद केले.

दावणगेरीतील मतांवर प्रतिक्रिया

दावणगेरी येथे अल्पसंख्याक मतांमध्ये घट झाल्याबाबत विचारले असता, जारकिहोळी म्हणाले, “हे स्थानिक कारणांमुळे झाले असावे. स्थानिक उमेदवार नसणे किंवा अंतर्गत कारणे असू शकतात. मात्र याबाबत सध्या निश्चित काही सांगता येणार नाही. पुढील दोन वर्षांत ही परिस्थिती सुधारावी लागेल.”

पक्षांतर्गत गोंधळावर भाष्य

नसीर अहमद आणि जब्बार यांच्या निलंबनाबाबत त्यांनी सांगितले की, “पक्षातील गोंधळामुळेच काही मते कमी झाली. चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करायला हव्यात. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात संधी द्यावी.”

तामिळनाडूतील राजकारणावर भूमिका

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत बोलताना जारकिहोळी म्हणाले, “ते सेक्युलर आहेत आणि आम्हीही सेक्युलर आहोत. जे सेक्युलर आहेत त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यामुळे सेक्युलर विचार टिकून राहतील.”

शेवटी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “सर्व मतभेद दूर करून पक्ष संघटना मजबूत करणे हीच सध्या सर्वात मोठी गरज आहे.”

About Belgaum Varta

Check Also

बनावट गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; एक जण अटकेत, दोघांचा शोध सुरू

Spread the love  बंगळूर : दहावी (एसएसएलसी), बारावी (पीयूसी) आणि पदवी अभ्यासक्रमांच्या बनावट गुणपत्रिका तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *