Monday , May 25 2026
Breaking News

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेगाडीला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

Spread the love

 

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. या नव्या रेल्वेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून बेळगावमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत असल्याचे सांगितले. बेंगळुरू-मुंबई दरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर रेल्वेसेवाही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कर्नाटकातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगताना त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील ६१ स्थानकांचा २,१६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असल्याची माहिती दिली. त्यापैकी ९ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. बेंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाचा ४८५ कोटी रुपये, तर यशवंतपूर स्थानकाचा ३६७ कोटी रुपयांत विकास केला जात आहे.

२०१४ पासून कर्नाटकमध्ये सुमारे १,७५० किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हासन-मंगळुरू विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरू उपनगरी रेल्वे प्रकल्पातील चारही कॉरिडॉरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगताना त्यांनी बैयप्पनहळ्ळी-चिक्कबनवारा आणि हिलालिगे-राजानुकुंटे मार्गांवरील जमीन संपादन पूर्ण झाल्याची माहिती दिली. केएसआर बेंगळुरू-देवनहळ्ळी आणि केंगेरी-व्हाईटफिल्ड मार्गांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली असून लवकरच सर्वेक्षण सुरू होणार आहे. या उपनगरी रेल्वेमुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठहळ्ळी आणि हेब्बळ यांसारखी महत्त्वाची केंद्रे जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये सध्या १२ जोड्या वंदे भारत गाड्या धावत असून बेंगळुरू-मंगळुरू मार्गावरील चाचणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेंगळुरू-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. एसएमव्हीटी बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६५५३/५४) सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. ही सेवा देशातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एका मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थानिसंद्रा येथे २७० कोटी रुपयांत वंदे भारत स्लीपर देखभाल डेपो उभारण्यात येणार असून एसएमव्हीटी बेंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांचा चेअर कार देखभाल प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही सोमण्णा यांनी दिली.

कार्यक्रमाला खासदार पी. सी. मोहन, राज्यसभा खासदार लहर सिंग सिरोया आणि खासदार तेजस्वी सूर्या हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. तसेच बेंगळुरू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंह आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील चारसह राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणुक

Spread the love  बंगळूर : भारतीय निवडणुक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *