Sunday , July 26 2026
Breaking News

बंगळुर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’ १८१ प्रवासी सुरक्षित

Spread the love

 

बंगळूर : एअर इंडियाच्या दिल्ली-बंगळुर उड्डाणादरम्यान गुरुवारी सकाळी गंभीर प्रकार घडला. दिल्लीहून बंगळुरकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २६५१ या विमानाला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना ‘टेल स्ट्राइक’चा सामना करावा लागला. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग करत असताना त्याच्या शेपटीचा भाग धावपट्टीला घासला गेला. मात्र, विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले आणि सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हे उड्डाण एअर इंडियाच्या ‘ए-३२१’ या नॅरो-बॉडी विमानाद्वारे संचलित करण्यात येत होते. प्राथमिक माहितीनुसार, विमान धावपट्टीजवळ येत असताना त्याला ‘वेक टर्ब्युलन्स’चा फटका बसला. त्यामुळे वैमानिकाने तातडीने ‘गो-अराउंड’ प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेदरम्यान विमानाच्या शेपटीचा भाग धावपट्टीला लागल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जवळच एका मोठ्या ‘वाइड-बॉडी’ विमानाच्या उड्डाणामुळे निर्माण झालेल्या हवेच्या प्रचंड दाबलहरींमुळे हे ‘वेक टर्ब्युलन्स’ निर्माण झाले. मात्र, संबंधित वाइड-बॉडी विमानाची नेमकी माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

घटनेनंतर संबंधित विमान तातडीने तपासणीसाठी सेवेतून बाजूला काढण्यात आले आहे. नियामक संस्थांच्या समन्वयाने या घटनेची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेचा परिणाम परतीच्या उड्डाणावरही झाला असून बंगळुरहून दिल्लीकडे जाणारे एआय २६५२ हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. प्रभावित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले. विमानतळावर एअर इंडियाची ग्राउंड टीम प्रवाशांना आवश्यक ती मदत पुरवत आहे.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन (एफएए)नुसार, ‘वेक टर्ब्युलन्स’ म्हणजे विमान उड्डाण करताना निर्माण होणाऱ्या शक्तिशाली हवेच्या भोवऱ्यांचा परिणाम होय. हे भोवरे मागून येणाऱ्या विमानांसाठी धोकादायक ठरू शकतात.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *