Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटकातील चारसह राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणुक

Spread the love

 

बंगळूर : भारतीय निवडणुक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली असून, मतदान १८ जून रोजी होणार आहे. विशेषतः कर्नाटकातील चार जागांसाठी होणारी निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, जून २१ ते जुलै १९ दरम्यान विविध राज्यांतील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी चार जागा रिक्त होत असून, मध्यप्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच झारखंडमधील दोन, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल.

कर्नाटकातून राज्यसभेवर असलेले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे, एच. डी. देवेगौडा यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. याशिवाय राज्यातील राजकीय समीकरणांवरही या निवडणुकीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, निवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असून, ९ जून रोजी छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

१८ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ नंतर मतमोजणी सुरू होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

मतदान प्रक्रियेत मतदारांनी प्राधान्यक्रम नोंदविताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या जांभळ्या रंगाच्या विशेष स्केच पेनचाच वापर करावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. इतर कोणत्याही पेनचा वापर मान्य केला जाणार नाही. मुक्त व निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शिब्बू सोरेन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक होणार आहे. तसेच अयोध्यारामी रेड्डी अल्ला, पिल्ली सुभाषचंद्र बोस, रामभाई हरजीभाई मोकरिया, जॉर्ज कुरियन, महाराजा सनाजाओबा लीशेंबा, वान्वेरॉय खारलुखी, नीरज डांगी, राजेंद्र गेहलोत, नबाम रेबिया, ईरण्णा कडाडी आणि के. वनलालवेना यांचाही कार्यकाळ संपत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *