Sunday , September 20 2026
Breaking News

मान्सूनची दडी; राज्यावर दुष्काळाचे गडद सावट

Spread the love

 

२९ टक्के पर्जन्यतूट; खरीप पिके संकटात, पुढील पंधरवडा निर्णायक

बेंगळुरू : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा दडी मारल्याने दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टी आणि मलनाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने जलाशयांमध्ये होणारी पाण्याची आवक झपाट्याने घटू लागली असून राज्यातील अंतर्गत भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाला बसला आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकातील बहुतांश जिल्हे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पेरण्या खोळंबल्या असून उगवलेली पिकेही पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून जुलै महिन्यातच दुष्काळाची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राच्या आकडेवारीनुसार, १ ते १० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ८४ मिमी पावसाच्या तुलनेत ८५ मिमी पाऊस झाला असला, तरी हा पाऊस प्रामुख्याने किनारपट्टी आणि मलनाड भागातच केंद्रित राहिला. दुसरीकडे, दक्षिण अंतर्गत भागात तब्बल ५८ टक्के, तर उत्तर अंतर्गत भागात ६० टक्के पर्जन्यतूट नोंदविण्यात आली आहे. दक्षिण अंतर्गत भागात अपेक्षित २१ मिमी पावसाऐवजी केवळ ९ मिमी पाऊस झाल्याने तीव्र पर्जन्यतुटीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

१ जून ते १० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी २८४ मिमी पावसाऐवजी केवळ २०१ मिमी पाऊस झाला असून एकूण २९ टक्के पर्जन्यतूट नोंदली गेली आहे. जानेवारी ते १० जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीतही राज्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर अंतर्गत भाग वगळता राज्यातील बहुतांश प्रदेशात पावसाची मोठी तूट कायम आहे.

हवामान तज्ज्ञांनी पुढील पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत मान्सूनने जोरदार पुनरागमन केले नाही, तर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याबरोबरच खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, राज्याला यंदा दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *