



पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला यश; राज्य सरकारचा अधिकृत आदेश जारी
बेळगाव : वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे नामकरण आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा रस्ते परिवहन महामंडळ’ असे करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून गेल्या पाच वर्षांपासून होत असलेल्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश परिवहन विभागाने गुरुवारी जारी केला.
महामंडळाच्या नामकरणाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर परिवहन विभागाने अधिकृत आदेश काढून नामकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांकडून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.
वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रात बेळगाव, धारवाड, कारवार, बागलकोट, गदग आणि हावेरी या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागातील ऐतिहासिक वारसा आणि जनभावनांचा विचार करून महामंडळाला कित्तूरच्या शूर वीरांगना राणी चन्नम्मा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध संघटनांनी सातत्याने लावून धरली होती.
कित्तूरच्या ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक असलेल्या राणी चन्नम्मा यांच्या नावाने महामंडळाची ओळख निर्माण व्हावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. कित्तूर उत्सवातही हा विषय वारंवार उपस्थित करण्यात आला होता. अखेर राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नामकरणाचा निर्णय घेतला असून, अधिकृत आदेश जारी झाल्याने मागणीची पूर्तता झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta