बेंगळुरू : गेल्या 75 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसेवा करत आहे. मात्र सिद्धरामय्या संघाविषयी अपप्रचार करत सुटले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
‘संघाची चड्डी समाजात भांडणे लावत सुटली आहे’ या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, संघाने देशभक्ती केली आहे. संकटात लोकांना सहाय्य केले आहे. मात्र काही लोक त्यांच्याविषयी दिशाभूल करत आहेत. सिद्धरामय्या सुद्धा अपप्रचार करत सुटले आहेत. यामुळेच अनेक राज्यात आज काँग्रेसचे नामोनिशाण राहिलेले नाही. पुढील काळात कर्नाटकातही ते अस्तित्व गमावून बसतील असे भाकीत बोम्मई यांनी केले.
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होईल का या प्रश्नावर 10 जूनपर्यंत प्रतीक्षा करा असे बोम्मई म्हणाले. पाठ्यपुस्तकातील चुकांवरून राजकारण केले जात आहे. त्या सगळ्याला आमच्या शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, असे बोम्मई यांनी सांगितले.
