बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले की, रायचूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना खेदजनक आहे. आमच्या सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहीजण जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत आहेत. याबाबत तांत्रिकदृष्ट्या तपास करून अहवाल देण्याच्या सूचना मी यापूर्वीच अधिकार्यांना दिल्या आहेत. रायचूरच्या सर्व वॉर्डातील पिण्याच्या पाण्याची नमुना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. पिण्याच्या पाण्याबाबत खूप काळजी घ्यावी, असे सांगितले आहे.
सरकारी अधिकार्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे का याचा तपास डीवायएसपींच्या नेतृत्वाखालील करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मृतांच्या कुटुंबियांना सीएम रिलीफ फंडामधून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील असे त्यांनी सांगितले.
