बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावातील बागेत कूपनलिकेत पडलेल्या सात्विक या दोन वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रभर राबवण्यात आलेल्या ऑपरेशनला यश आले आहे. पोलिस, अग्नि शामक दल, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या २० तासांच्या ऑपरेशननंतर मुलाला वाचवण्यात यश आले.
कूपनलिकेतून बाहेर काढलेल्या सात्विक नावाच्या मुलावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवण्यात आले. डोके खाली करून २० फूट खोल कूपनलिकेत पडलेल्या मुलाला बाहेर काढण्याचे रेस्क्यू टीमचे प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय होते.
रात्री हैद्राबादहून आलेले एनडीआरएफचे पथक घटनास्थळी मुलाच्या बचाव कार्यात गुंतले होते. स्थानिक अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. कूपनलिकेशेजारी दोन जेसीबी लावून दोन्ही बाजूने खड्डे खादण्यात आले व त्यानंतर मूल पडलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचता आले.
बाळाला नळीद्वारे ऑक्सिजन दिला जात होता. कॅमेऱ्यात सात्विकचा पाय थरथरत असल्याचे दृश्य पाहून मूल जिवंत आहे आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले जाईल, असा विश्वास वाटला. पालकांनी आणि हजारो लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र खोदकामात दगड लागल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.
स्टोनब्रेकरच्या सहाय्याने खडक फोडून बचाव पथक मुलापर्यंत पोहोचले आणि पाईपमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आले. जिल्हाधिकारी टी. बुबलन, एसपी ऋषिकेश सोनंगा, उपविभागीय अधिकारी आबिद गड्याला घटनास्थळी ठाणमांडून बसले होते. त्यांनी बचावकार्यात मार्गदर्शन केले.