बंगळूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १४) निवडणूक प्रचारासाठी येत असून ते म्हैसूर आणि मंगळूरमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत.
पंतप्रधान मोदी उद्या दुपारी ४ वाजता म्हैसूरमध्ये पोहोचतील आणि म्हैसूरच्या महाराजा कॉलेज मैदानावर भाजपच्या विजयसंकल्प महामेळाव्यात सहभागी होतील आणि भाजपचा प्रचार करतील.
म्हैसूरमध्ये जाहीर सभेला हजेरी लावल्यानंतर पंतप्रधान मोदी मंगळूरला जाऊन भाजपला खिळवून ठेवण्यासाठी उद्या रात्री रोड शो करणार आहेत.
पंतप्रधान मोदी मंगळूरमधील श्री नारायणगुरु सर्कल ते नवभारत सर्कलपर्यंत खुल्या वाहनातून रोड शो करणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या या प्रचार सभांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
कडेकोट सुरक्षा
पंतप्रधान मोदींच्या उद्या म्हैसूर आणि मंगळूर येथे होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर आणि मंगळूर या दोन्ही ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.