कर्नाटकाचे नाही, महाराष्ट्राचे सरकार कोसळण्याचा दावा
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर त्यांना चांगलेच फटकारले. आमचे आमदार विकले जाणारे नसल्याचे सांगून राज्यातील काँग्रेस सरकार पाडता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे कारवाया होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पडू शकते, असे संकेत दिले आहेत. त्यावर कर्नाटकात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.
शहरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भाकीतावर तीव्र प्रतिक्रीया दिली. भाजप भ्रामक आणि दिवास्वप्न पाहत आहे. ऑपरेशन कमल करून महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटक सरकार पाडणे शक्य नाही, असे त्यांनी शिंदे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे पतन होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी केंद्रात स्पष्ट बहूमत मिळविणार आहे. काँग्रेस केंद्रात नेतृत्व करेल. कॉंग्रेसचाच पंतप्रधान होईल. राज्यात काँग्रेस २० हून अधिक जागा जिंकेल, असे ते म्हणाले.
आमचे आमदार विकले जाणार नाहीत. गेल्या वर्षभरापासून भाजप नेते राज्यातील कॉंग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांना यश मिळाले नाही. ते प्रत्येक वेळी अपयशी ठरत आहेत. प्रयत्न करणे आणि अयशस्वी होणे ही त्यांची आता सवय झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा प्रयत्न करतील असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेते सरकार कोसळण्याची चर्चा करत आहेत, असे सांगून सिद्धरामय्या म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पराभवाची भीती बाळगून आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणावरील नियंत्रण सुटले आहे.
शिंदे सरकारलाच धोका
डी.के. शिवकुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सरकार टिकेल की नाही याबाबत शंका आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्थलांतरित झालेले आता मातृपक्षात परतत आहेत. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे म्हणजेच महाआघाडीचे सरकार येईल, असे भाकीत त्यांनी केले. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान उद्धव ठाकरेंवर टीका करीत असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील काँग्रेस सरकार कोसळेल अशी भाजप स्वप्न पाहत असल्याची खिल्ली परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी उडविली. धजद आणि भाजपचे एकत्रित ८४ आमदार आहेत. आमचे १३७ आमदार आहेत. आमचे सरकार पडायचे असेल तर ५५ पेक्षा जास्त आमदारांनी राजीनामे द्यावे लागतील, जे शक्य नाही, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २८ मतदारसंघ जिंकणार असल्याचा दावा ते करत होते. पण लोकांची नाडी बघितली तर त्यांना एकच आकडा पार करणं कठीण आहे. काँग्रेसचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. रेड्डी म्हणाले की, भाजप हतबल आहे यासाठी अशा प्रकारची मूर्खपणाची मोहीम चालवत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाला महत्त्व देण्याची गरज नाही. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळेल. प्रथम त्यांनी आपले सरकार सांभाळावे, असा सल्ला रामलिंगा रेड्डी यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी पडद्यामागची कसरत सुरू असल्याचे स्फोटक विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
महाराष्ट्रातील सातारा येथे बोलताना शिंदे म्हणाले, मी नुकताच कर्नाटकात एका सभेला गेलो होतो. नाथ कर्नाटकातही काम करतील, असे तेथील नेत्यांनी सांगितले. मी विचारले नाथ ऑपरेशन म्हणजे काय? त्यावर ते म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार पाडले आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या अनुभवाची गरज आहे. हे नाथ ऑपरेशन आहे. त्यावर मी नक्की येईन असे त्यांना सांगितले.
कर्नाटकात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार राहणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात येण्याचे निमंत्रण कर्नाटकातील नेत्यांनी दिल्याचे शिंदे यांनी साताऱ्यातील बैठकीत सांगितले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची कर्नाटकच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असून भाजप-धजद नेते काँग्रेस सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन करणार असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिल्याने राज्यातील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने सुरू आहेत, हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरले आहे.