बेळगाव : शहरातील शहापूर येथील नाथ पै सर्कल परिसरात मंगळवारी दुपारी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालवत असलेला गणेश नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकीवरील मागील प्रवाशालाही गंभीर दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण आणि फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta