Wednesday , June 24 2026
Breaking News

दड्डी सरकारी दवाखान्यात सर्पदंशावरील लस नसल्याने महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये संताप

Spread the love

 

हुक्केरी : शट्टिहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील शेतकरी महिला शांता कृष्णा कळविकट्टे यांचा सर्पदंशामुळे उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, दड्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील प्रतिलस (अँटी स्नेक व्हेनम) उपलब्ध नसल्याने हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांता कळविकट्टे या नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामासाठी गेल्या होत्या. काम करत असताना त्यांच्या पायाच्या बोटाला काहीतरी चावल्याचे जाणवले. मात्र, त्या ठिकाणी आधीपासून किरकोळ जखम असल्याने काहीतरी लागले असावे असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले काम सुरूच ठेवले.

काही वेळानंतर शेतातील रखवालीसाठी असलेल्या दोन कुत्र्यांना जेवण घालण्यासाठी उठल्या असता त्यांना चक्कर येत असल्यासारखे वाटू लागले. परिसरात कोणीही नसल्याने त्यांनी धैर्याने जवळपास एक किलोमीटर अंतर चालत मुख्य रस्त्यापर्यंत मजल मारली. तेथे त्यांनी कृष्णा सुतार यांच्या वाहनाला हात दाखवून मदतीची विनंती केली. त्यानंतर त्यांना तातडीने दड्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

मात्र, दड्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील आवश्यक प्रतिलस उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. दड्डी आणि बेळकी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुमारे १७ गावांतील नागरिक अवलंबून आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहत असून शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना घडण्याची शक्यता कायम असते. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील जीवनरक्षक प्रतिलस उपलब्ध नसणे अत्यंत धोकादायक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र सीमेजवळील नेसरी येथील सरकारी दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे आपल्या भागातील आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा का उपलब्ध नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शांता कळविकट्टे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दड्डी व बेळकी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिलस तातडीने उपलब्ध करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

“वेळेत उपचार आणि प्रतिलस उपलब्ध असती तर शांता कळविकट्टे यांचा जीव वाचू शकला असता,” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘मराठी भाषा प्रेरणा मंच’तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित

Spread the love  बेळगाव : सन् 2025-26 मध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *