Friday , July 3 2026
Breaking News

जुलैत मान्सूनचा दमदार कमबॅक; बेळगावसह उत्तर कर्नाटकात ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

Spread the love

 

बेळगाव : जून महिनाभर मान्सूनने राज्याला अक्षरशः हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले. धरणांतील जलसाठा घटला, शेतीची कामे खोळंबली आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र आता जुलैच्या प्रारंभी हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजामुळे दिलासादायक चित्र समोर आले असून बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकात ७ जुलैपर्यंत समाधानकारक ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर दक्षिण कर्नाटकातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ जुलै रोजी किनारपट्टी भागात अतिवृष्टीची शक्यता असून ५ ते ७ जुलैदरम्यान दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्येही ७ जुलैपर्यंत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश असून, गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे.

जून महिन्यातील पावसाच्या मोठ्या तुटीमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातही शेतीपिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दमदार पुनरागमन करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

हवामान खात्याचा अंदाज प्रत्यक्षात उतरल्यास धरणांतील जलसाठ्यात वाढ होईल, पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होईल आणि खरीप हंगामालाही मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *