





गणेशोत्सवापूर्वी स्वच्छता, दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वडगाव मेन रोडवरील चावडी गल्ली कॉर्नर, नाझर कॅम्प परिसरातील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन तलावाची दयनीय अवस्था समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी तलावाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
विसर्जन तलावाची स्वच्छता, दुरुस्ती, परिसरातील मूलभूत सुविधा, भाविकांची सुरक्षितता तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सव काळात या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक व गणेशमूर्ती विसर्जनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सव सुरू होण्यापूर्वी तलावाची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती पूर्ण करावी, परिसरात प्रकाशयोजना व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
विसर्जनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे, यासाठी संबंधित प्रशासनाने वेळ न दवडता नियोजन करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पाहणीवेळी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी, मनोहर हलगेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, अमोल देसाई, संजय शिंदे, राजेंद्र बिर्जे, सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील, सुनील बोकडे, राजेंद्र बैलूर, भरत नाग्रोळी, उदय पाटील आणि गुणवंत पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta