चिकोडी : शहरातील गुरुवार पेठ परिसरात संशयित शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून जयश्री गारमेंट्स हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण करत दुकानामागील अनेक निवासी घरांनाही विळखा घातल्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता व घरगुती साहित्याचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात जयश्री गारमेंट्समध्ये झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यानंतर ती वेगाने शेजारील घरांमध्ये पसरली. दुकानातील कपड्यांचा साठा तसेच इतर साहित्य पूर्णपणे जळून नष्ट झाले. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच चिकोडी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील संबंधित यंत्रणांकडून तपासला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta