मृग नक्षत्र कोरडे गेल्याने हंगाम वाया जाण्याची भीती
निपाणी (वार्ता) : मृगातील पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकनी केली आहे. पण त्यानंतर पाऊसच न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात आणि मृग नक्षत्राच्या पहिल्या सहा-सात दिवसांत वरुणराजाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भाग कोरडाच राहिला आहे. पावसाच्या एकाही दमदार सरीविना मृग नक्षत्र संपते की काय, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.
मृग नक्षत्राच्या कालावधी ८ जून ते २१ जून या काळात पडणारा मृगाचा पाऊस होतो. या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होतो. त्यामुळे पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. मात्र यंदा मृग नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने शेतशिवारात पेरणीची लगबग दिसून आलेली नाही. परिणामी बळीराजा वरूनराजाच्या प्रतीक्षेत दिवस मोजत आहेत. खरीप पिकांच्या पेरणीसाठी मृग नक्षत्रात साधारण ३० ते ४० मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र यंदा गेल्या आठवडाभरात काही ठिकाणी सरासरी पाच मिली मीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेतरी पुरेशा पावसाअभावी बियाण्यांची उगवण होण्याबाबत साशंकता आहे. कडक ऊन पडत असल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी स्पिंकलर द्वारे सोयाबीन पिक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta