Friday , June 26 2026
Breaking News

सदलग्यातील मोहरम एक सर्वव्यापी उत्सव

Spread the love

 

सदलगा : येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब शमनामीरच्या भव्य आणि प्रशस्त दर्गा परिसरात सदलगा शहरातील तसेच उपनगरांतील पीर-पंजे तथा नालसाब भेटीच्या शेवटच्या दिवसांचा मोहरमचा कार्यक्रम अतिशय उत्साहात, रणहलगी, झांज,  ढोल ताशाच्या  दणदणाटात साजरा झाला.

प्रमुख दर्गा, दर्गा चौक, गांधी रोड वरील मोठ्ठा मठ, लहान मठ येथील अर्ध चंद्राकृती नाल असलेले पीर, संयुक्त सोमवार पेठ, म्युनिसिपालिटी, झेंडा चौक, शास्त्री चौक, लहान वेस,मोठी वेस, नेहरू चौक, निंबाळकर गल्ली, बिरोबा गल्ली, बागडी गल्ली आगा मशीद, डॉ आंबेडकर नगरातील विविध मंडळे, डांगे प्लॉट, बोरगांवे प्लॉट, गवंडी प्लॉट, बाजीराव प्लॉट, विद्यानगर, आश्रय कॉलनी, प्रकाश नगर, बसव नगर, मल्लण्णावर वस्ती, भैनाकवाडी, वडगोल, नेज आणि आणखीही विविध मंडळे असे सुमारे दीडशेच्या आसपास मंडळांनी पीर स्थापन केले होते. सर्व पीर-पंजे प्रामुख्याने शमनामीराच्या दर्ग्यात येऊनच भेटी घेण्याचा प्रघात आहे त्याप्रमाणे रणहलगी, झांज, ढोल, ताशाच्या दणदणाटात या भेटीचा कार्यक्रम झाला. दर्गा चौक, संयुक्त सोमवार पेठ गांधी चौक, दत्त चौक अशा प्रमुख ठिकाणी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. अबीर, खारीक, खोबऱ्याची उधळण होत होती. गांधी चौकात बीबी फातिमाचे पाच पंजे दर्ग्यातून आणले जातात आणि गांधी पुतळ्यासमोर  चौकाच्या मधोमध स्थापले जातात, त्या पंजांना तीन-पाच प्रदक्षिणा काढून पंजे भेटी होत होत्या, पंजे ढोल ताशाच्या लयीत झुलवत, नाचवले जात होते. महिला वर्गाकडून पंजांवर खारीक खोबऱ्याची उधळण होत होती. सर्व भाविक अबीर उधळत होते, सर्वत्र पिवळी उधळण दिसत होती, रस्ते पिवळे झाले होते.

आदले दिवशी कत्तल रात्रीचाही या मोहर्रम काळातील महत्वाचा दिवस म्हणून त्या दिवशी मलिद्याचा नैवेद्य भाविकांकडून अर्पण केला गेला. दूधगंगेच्या उपलब्ध पाण्यात डुबकी मारुन, कांही घरातून आंघोळी करून तिथूनच ओल्या अंगाने दंडवत घातले जात होते आणि भाविकांकडून नवस सायास फेडले जात होते. दर्गा प्रांगणात संध्याकाळी नवस बोलणारे तरुण भाविक पेटत्या निखाऱ्यावरुन नाचत जाऊन पेटते निखारे हातात घेऊन मशिदीसमोरील ऊद-धुनीमध्ये टाकण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

येथील हा मोहरम सणाचा धार्मिक पिरपंजा भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मलिकवाड, बहिणाकवाडी, वडगोल, जनवाड, बेडकिहाळ, शमनेवाडी, बोरगाव, चिकोडी, निपाणी, गळतगा, अकोळ, कोल्हापूर, हुपरी, रेंदाळ, कुरुंदवाड, इचलकरंजी, मिरज, सांगली, घोसरवाड, दत्तवाड येथील अबाल वृद्ध आणि महिलांनी मोठ्ठी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके यांना हद्दपार करण्यासाठी आत्ता करवे चिकोडी तालुका घटक रस्त्यावर

Spread the love  बेळगाव : सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *