

चिकोडी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्लोळजवळ कृष्णा नदीत सध्या सुमारे ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे चिकोडी व निपाणी तालुक्यातील पाच सखल पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी अनेक गावांचा रस्ते संपर्क तुटला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
येडूर-कल्लोळ, बावनसौंदत्ती-मांजरी, बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज आणि भोज-शिवापूरवाडी हे पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांना आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta