


अध्यक्षपदी बिनविरोध निवड; शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या विस्ताराचा संकल्प
गडहिंग्लज : दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दिशा शिक्षण व विकास केंद्र, गडहिंग्लजच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष नरसू पाटील यांची सर्व सभासदांनी एकमताने बिनविरोध निवड केली. उच्च न्यायालय व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक श्री. सत्यनारायण शेनॉय यांच्या निरीक्षणाखाली दि. १७ जुलै २०२६ रोजी संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले प्रयत्न तसेच नरसू पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची यशस्वी उभारणी यामुळे संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या या प्रगतीमागील नेतृत्वाची दखल घेत सभासदांनी पुन्हा एकदा नरसू पाटील यांच्यावर विश्वास दाखविला.
यावेळी ब्रह्मानंद नरसू पाटील यांची सचिवपदी, संतू दत्तू पाटील यांची उपाध्यक्षपदी तर युवा नेतृत्व शुभम संतू पाटील यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेत संस्थेचा जमाखर्च, आगामी अंदाजपत्रक तसेच हॉस्पिटल व महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. सर्व ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नरसू पाटील यांनी संस्थेच्या भविष्यातील विस्ताराचा संकल्प व्यक्त करताना मरीन इंजिनिअरिंग कॉलेज, बीएचएमएस कॉलेजची १०० प्रवेश क्षमता वाढविणे तसेच पॅरामेडिकल शिक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. “या परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आणि या कॅम्पसचे नंदनवन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
निवडीनंतर अध्यक्ष नरसू पाटील, सचिव ब्रह्मानंद पाटील व उपाध्यक्ष संतू दत्तू पाटील यांचा हायकोर्टचे प्रसिद्ध वकील प्रशांत भावके यांच्या हस्ते तर खजिनदार शुभम पाटील यांचा नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणारे प्रशासकीय अधिकारी अप्पा शिवणे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. जे. आर. फगरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. जे. आर. फगरे म्हणाले, “नरसू पाटील यांच्या नेतृत्वामुळे संस्थेला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून भविष्यात महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थांमध्ये दिशा शिक्षण व विकास केंद्राचे नाव निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.”
नरसू पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली दिशा शिक्षण व विकास केंद्राच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून संस्था शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात आणखी उंच भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Belgaum Varta Belgaum Varta