खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध भागात समस्यांचा डोंगर आहे. विद्यानगरात रस्ता, गटारी, डुक्कराची वर्दळ अशी समस्या असतानाच आता मारूतीनगरातील रस्ता, गटारी व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा या मागणीसाठी भाजपचे नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी व स्थायी कमिटी अध्यक्ष मादार व मुख्याधिकारी विवेक बन्ने यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मारूती नगर दुसरा क्राॅसच्या गटारचे घाण पाणी कुडतुरकर यांच्या प्लाॅटमधून पहिल्या क्राॅसमधील लोकांच्या घरात घुसत असल्याने भयंकर त्रास होत आहे. त्यासाठी नवीन गटार बांधून घाण पाण्याच विल्हेवाट लावावी. तसेच मारूती नगरमध्ये गावडे यांच्या घरापर्यंत विद्युत खांब घालण्यात आले आहेत. ते खांब कब्बाडी यांच्या घरापर्यंत घालण्यात यावेत. याशिवाय ज्या भागात पाण्याची समस्या आहे त्या भागात पाण्याच्या टाक्या बसवा आदी मागण्या निवेदनाव्दारे देण्यात आल्या. यावेळी निवेदनाचा स्विकार करून मागण्या पूर्ण करू असे आश्वासन नगराध्यक्ष मजहर खानापूरी, लक्ष्मणराव मादार, नगरसेवक रफिक वारीमनी यांनी दिले.
