Tuesday , August 18 2026
Breaking News

मराठी शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा; खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कन्नड, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना मराठीची पुस्तके का उपलब्ध नाहीत किंवा त्यांची छपाई का करण्यात आली नाही, असा सवाल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

समितीच्या वतीने मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. मातृभाषा प्रथम भाषा मानली जात असताना मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

याशिवाय मराठी शाळांमध्ये कन्नड वर्ग सुरू करण्यास समितीने विरोध दर्शविला. कन्नड शाळांना मान्यता देताना संबंधित गावातील नागरिकांची संमती घेणे आवश्यक असल्याचे सांगत, मराठीबहुल भागांमध्ये मराठी शाळांना मान्यता नाकारून कन्नड शाळांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. मराठी शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही समितीच्या नेत्यांनी उपस्थित केला.

मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाबाबत तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, मारुती गुरव, राजाराम देसाई, खजिनदार संजीव पाटील, अजित पाटील, सुनील पाटील, कृष्णा कुंभार, दीपक देसाई, पुंडलिक पाटील, डी. एम. भोसले, राजेंद्र कुलम, म्हात्रू धबाले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

Spread the love  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *