Tuesday , June 16 2026
Breaking News

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याची रणनीती

Spread the love

 

क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी पक्षाची खबरदारी

बंगळूर : विधानपरिषदेच्या सात जागांसाठी १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. क्रॉस व्होटिंगची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदाराना उद्या (ता. १६) पासून बिदडीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर आमदार मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस रिसॉर्टमध्येच मुक्काम करणार असून, गुरुवारी तेथून थेट विधानसौधात जाऊन मतदान करतील.

विधानपरिषदेच्या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात असल्याने काँग्रेसने आपल्या पाचही उमेदवारांच्या विजयासाठी काटेकोर नियोजन केले आहे. पक्षाच्या सर्व मतांचे योग्य विभाजन व्हावे आणि कोणत्याही प्रकारचे मतांतर होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही काँग्रेसची पहिली विधिमंडळ पक्ष बैठक असणार आहे. या बैठकीला एआयसीसीचे सरचिटणीस व कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच पक्षाचे सर्व कार्याध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत आमदारांना मतदानाची पद्धत, प्रथम आणि द्वितीय प्राधान्य मतांचे वाटप तसेच कोणत्या उमेदवाराला किती मते द्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत प्रथम व द्वितीय प्राधान्य मतांची व्यवस्था असल्याने त्याचे नियोजन पक्ष नेतृत्वाकडून केले जात आहे.

धजदने आठवा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेसने विशेष सावधगिरी बाळगली आहे. कोणताही आमदार पक्षविरोधी मतदान करू नये यासाठी सुर्जेवाला आमदारांना कठोर सूचना देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने या निवडणुकीसाठी बी.के. हरिप्रसाद, पी.व्ही. मोहन, तिप्पण्णा कमकनूर, मळवल्ली शिवण्णा आणि विनय कार्तिक यांना उमेदवारी दिली आहे.

प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी २८ मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे १३६ आमदारांचे संख्याबळ असून अपक्ष आमदार दर्शन पुट्टण्णय्या आणि लता मल्लिकार्जुन यांचा पाठिंबा पक्षाला मिळाला आहे. तसेच भाजपमधून निलंबित करण्यात आलेले एस.टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पाचही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर असल्याचे मानले जात आहे.

मात्र, मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने क्रॉस व्होटिंगची भीती कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मतदानापर्यंत सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानपरिषदेसाठी मतदान गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केला जाईल.

दरम्यान, भाजपने लिंगराज पाटील आणि रघु कौटिल्य यांना उमेदवारी दिली आहे. तर सातव्या जागेसाठी भाजपच्या पाठिंब्याने धजदचे गोविंदराजू मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सातव्या जागेवर कोण विजय मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

म्हैसूरमधील प्रसिद्ध रेस्टो पबला भीषण आग; दोन ठार

Spread the love  अभिनेता प्रीतमसह पाच जण गंभीर जखमी बंगळूर : म्हैसूर शहराच्या बाहेरील आर.टी.नगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *