Monday , August 17 2026
Breaking News

“माझ्या पराभवामागे संगनमत होते का?” – माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल

Spread the love

 

बेंगळुरू / खानापूर : कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामागे संगनमत होते का? मला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमधील काही आमदारांनी पक्षविरोधी मतदान केल्याची चर्चा रंगली असताना, खानापूरच्या भाजप आमदाराचे नाव समोर आल्याने निंबाळकर यांनी या घडामोडींवर भाष्य केले. त्यांच्या मते, जर संबंधित नेते काँग्रेसच्या संपर्कात होते, तर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचे संगनमत झाले होते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, विधानपरिषद निवडणुकीचे निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करत आहेत. काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच त्यांनी विरोधी पक्षातील कथित क्रॉस व्होटिंगकडे लक्ष वेधले आणि यामागील राजकीय घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्यात आले का? मंत्रीपद किंवा राजकीय लाभासाठी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराचाच पराभव करणाऱ्या नेत्यांसाठी पक्षनिष्ठा आणि विचारधारेचे महत्त्व उरते का?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

डॉ. निंबाळकर यांच्या या विधानामुळे खानापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या आरोपांमुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *