Tuesday , June 23 2026
Breaking News

खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मणतुर्गा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती दळवी हे कामानिमित्त दुचाकीवरून शिवाजीनगरकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मारुती दळवी हे खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस आबासाहेब दळवी यांचे बंधू आहेत.

वारंवार अपघातांमुळे नागरिक संतप्त

शिवाजीनगर परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने या ठिकाणी तातडीने गतीरोधक (स्पीडब्रेकर) उभारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. स्थानिक नागरिकांसह तालुका पंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब शेलार यांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“स्पीडब्रेकर बसवा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी”

या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना बाळासाहेब शेलार यांनी शिवाजीनगर येथे तात्काळ गतीरोधक बसविण्याची मागणी केली आहे. “वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या गंभीर दुर्घटनांसाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

Spread the love  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *