Sunday , July 26 2026
Breaking News

क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला पुन्हा उधाण; डॉ. अंजली निंबाळकरांकडून आ. विठ्ठल हलगेकरांवर निशाणा

Spread the love

 

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला नव्याने उधाण आले असून, खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या की, राज्य सरकारच्या कामामुळे काही भाजप आमदारांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा आहे. या चर्चेत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचेही नाव येत असल्याने “त्यांचे आभार” असल्याचे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.

यावेळी त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख करत, बेळगावातील काँग्रेसमधील काही नेत्यांनी आमदार हलगेकर यांना मदत केल्यामुळे आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप केला. संबंधित नेते कोण, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “याचे उत्तर आमदार हलगेकरच देऊ शकतात,” असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली.

डॉ. निंबाळकर यांनी पुढे आरोप केला की, त्यांच्या पराभवानंतर खानापूर तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून, विद्यमान आमदार विकासकामे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. “आजही तालुक्यातील नागरिक विविध समस्या घेऊन आमच्याकडे येतात. आम्ही सत्तेत नसल्यामुळे काही मर्यादा असल्या तरी त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत,” असे त्या म्हणाल्या.

डॉ. निंबाळकर यांनी प्रथमच पक्षांतर्गत नाराजी आणि कथित गटबाजीवर उघडपणे भाष्य केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल, तसेच कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवर पुढे काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *