Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे भरीव निधीची मागणी; आमदार विठ्ठल हलगेकर यांचे निवेदन

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि विविध मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के.. शिवकुमार यांच्याकडे केली आहे.

गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांची आमदार हलगेकर यांनी भेट घेऊन खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यामध्ये सिंचन, वीज, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी विशेष निधीची मागणी करण्यात आली.

निवेदनानुसार, तालुक्यातील सिंचन प्रकल्पांसाठी १०० कोटी रुपये, परिश्वाड–आवरोळी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये तसेच जळगा, शेडेगाळी, निलावडे आणि तोराळी गावांतील नदी प्रकल्पांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, जंगल आणि अतिवृष्टीग्रस्त भाग असल्याने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी भूमिगत वीज केबल (UG Cable) टाकणे, बैलूर–कणकुंबी येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणे, तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जांबोटी आणि कुंभारवाडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने मंजुरी देण्याची विनंतीही करण्यात आली.

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल आणि खानापूर तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्याची माहिती आमदार हलगेकर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *