

मारुती मंदिराजवळील स्मशानभूमी बनली गैरसोयीची;
पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणेही कठीण
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्मशान मारुती स्मशानभूमीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहेत. नवीन बांधलेल्या स्मशानभूमीचे हस्तांतरण केल्याने पावसाळ्यात जुन्या स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे. शेडमधून गळती होत असून अनेक गैरसोयींमुळे मृतदेह इतर स्मशानभूमीत न्यावे लागत आहे. जीर्ण शेड, पिण्याचे, स्वच्छतागृहाचा अभाव, संरक्षण भिंत नसणे, अपुरी प्रकाश व्यवस्था याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शहर परिसरातील तब्बल ७० हजारांवर लोकवस्तीचा भार या स्मशानभूमीवर आहे. हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत समाजांचे अंत्यसंस्कार येथे केले जातात. येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना पडून असल्याने शहर वासियांची गैरसोय होत आहे.
हजारो रुपये खर्च करून नवीन स्मशान शेड तीन-चार महिन्यापूर्वी निर्माण करण्यात आले आहे. पण त्याचा वापर सुरू झालेला नाही.
स्मशान शेड तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन दिले आहे. पण त्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळापूर्वी स्मशान शेड खुले न केल्यास नगरपालिका समोर आंदोलन करण्याचा इशारा शासन नियुक्त माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta