Monday , August 17 2026
Breaking News

हालात्री नदीच्या पुलावर तीन फूट पाणी; खानापूर-हेमाडगा मार्गावरील वाहतूक ठप्प

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून, अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खानापूर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हालात्री नदीसह मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीवरील पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली असून, पुलावरून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

वाहतूक सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी खानापूर–असोगा–मणतुर्गा–हेमाडगा किंवा खानापूर–लोंढा–रामनगर या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पूरस्थितीवर महसूल, पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून असून, नदीची पाणीपातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

दरम्यान, हालात्री नदीवरील जुन्या पुलामुळे दरवर्षी पावसाळ्यात वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने नवीन पुलाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांतून सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, पावसाळा संपल्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीन पूल उभारल्यानंतर परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांसह गोवा राज्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा अनेक वर्षांपासूनचा वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *