
खानापूर : खानापूर येथील ११० केव्ही उपकेंद्रात दुसऱ्या त्रैमासिक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खानापूर तालुक्यातील विविध भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (केपीटीसीएल) बेळगाव विभागाकडून खानापूर ११० केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरची नियोजित देखभाल तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामाच्या पार्श्वभूमीवर हुबळी वीज वितरण कंपनीच्या (हेस्कॉम) संबंधित फिडरवरील वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
या नियोजित देखभाल कामामुळे ११ केव्हीच्या १२ फिडर केंद्रांसह ३३ केव्हीचे दोन फिडर आणि ११० केव्ही एसडब्ल्यूआर-टीएसएस, खानापूर येथील वीजपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
११ केव्ही फिडरमध्ये लैला शुगर, देवलती, गर्लगुंजी, करंबळ, लोकोळी, मोदेकोप्प, काटगाळी ईआयपी, गणेबैल, खानापूर इंडस्ट्रियल एरिया, खानापूर कोर्ट आणि हेब्बाळ या परिसरांचा समावेश आहे.
तसेच ३३ केव्ही फिडरमध्ये लोंढा आणि खानापूर या भागांचा वीजपुरवठाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.
नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीनुसार वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती खानापूर हेस्कॉम विभागाकडून देण्यात आली आहे. खानापूर हेस्कॉम खात्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रवीण बरगाले आणि खानापूर शहर विभागाचे अधिकारी भरतेश नागनूरी यांनी संबंधित ग्राहकांना वीज खंडित होण्याची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta