
हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल; कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, खानापूर तालुक्याला तब्बल ४५ ज्युनियर पॉवरमन (लाईनमन) मिळणार आहेत. तालुक्यात लाईनमनची मोठी कमतरता असल्याची माहिती हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी निंबाळकर यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील हेस्कॉमचे कर्मचारी रायगड येथे डॉ. निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी तालुक्यात सुमारे ४३ लाईनमनची कमतरता असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन डॉ. निंबाळकर यांनी तत्काळ हेस्कॉमच्या एमडी वैशाली मॅडम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पॉवर मिनिस्टर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्री व्यस्त असल्याने फोन घेऊ शकले नाहीत; मात्र सुमारे २० ते २५ मिनिटांनी त्यांनी निंबाळकर यांना परत फोन केला. यावेळी निंबाळकर यांनी लाईनमनच्या कमतरतेबाबत एमडींशी चर्चा केली असून, तालुक्याला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
यानंतर खानापूर तालुक्यासाठी ४५ ज्युनियर पॉवरमनची नियुक्ती झाल्याची आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळाली.
ही माहिती हेस्कॉम कर्मचारी संतोष यांनी आज दिली. या निर्णयाबद्दल डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे आभार मानण्यासाठी त्या खानापूरला आल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
डॉ. निंबाळकर यांची भेट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संतोष राठोड, उदय मादार, हरीश कड्डूगोळ, गंगाधर चवळगी, भरतेश नागणूर, अनिल पुजारी, आसिफ अत्तार आणि बसवराज हवालदार यांचा समावेश होता.

Belgaum Varta Belgaum Varta