Sunday , September 20 2026
Breaking News

रोजगार हमीच्या कामावरून डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला!

Spread the love

 

गोदगेरी क्रॉसजवळ दुचाकी झाडावर आदळली; बाळगुंदच्या मजुराचा जागीच मृत्यू

खानापूर : रोजगार हमीच्या कामावर असताना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. डॉक्टरांकडे उपचार घेऊन घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगतच्या झाडावर दुचाकी आदळली. या भीषण अपघातात बाळगुंद येथील मजुराचा जागीच मृत्यू झाला. संजय गणपती सुतार (रा. बाळगुंद) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने बाळगुंद परिसरावर शोककळा पसरली आहे.

गोधोळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाळगुंद येथे व्हीबी रामजी योजनेअंतर्गत रोजगार हमीचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय सुतार कामाच्या ठिकाणी हजर झाले. कामासाठी आवश्यक असलेला फोटोही त्यांनी काढून दिला. मात्र, काही वेळाने त्यांना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला.

कामाच्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार सुतार स्वतःच्या दुचाकीवरून डॉक्टरांकडे गेले. उपचार घेऊन घरी परतत असताना गोदगेरी क्रॉसजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली. धडक एवढी भीषण होती की, संजय सुतार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंदगड येथे सुरू असलेल्या प्रजासेवा आंदोलनाच्या कार्यक्रमादरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री, संबंधित सहाय्यक अधिकारी तसेच ग्रामपंचायत विकास अधिकारी हनुमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

व्हीबी रामजी योजनेचे वरिष्ठ प्रोजेक्ट डायरेक्टर गंगाधर यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, अपघाताची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, दुचाकीवरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *